D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये AEDP अभ्यासक्रमाचा शुभारंभ; उच्च शिक्षणातील गुणवत्ता व NAAC सुधारणांवर सखोल मार्गदर्शन

    कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), कोल्हापूर येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या वतीने Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) – बी.कॉम. (बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स – BFSI) या रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रमाचा शुभारंभ उत्साहात झाला. याचबरोबर "Quality Initiatives in Higher Education" या विषयावरील प्राध्यापक विकास कार्यक्रम (Faculty Development Programme) मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाला.

    कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. (डॉ.) सागर डी. डेळेकर, संचालक, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकजेस (IIL) व IQAC, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी प्रत्यक्ष जोडणाऱ्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण–२०२० अंतर्गत उद्योग-शिक्षण समन्वय, कौशल्याधिष्ठित शिक्षण, रोजगाराभिमुख संधी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    यानंतर आयोजित प्राध्यापक विकास कार्यक्रमात त्यांनी उच्च शिक्षणातील गुणवत्ता वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या NAAC च्या नव्या सुधारणा, गुणवत्ता निकष, Binary Accreditation Framework, संस्थात्मक गुणवत्ता संस्कृती, सतत गुणवत्ता वृद्धीची दिशा आणि भविष्यातील गुणवत्ता उपक्रम याविषयी सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देत संस्थांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

    यावेळी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या संशोधन नियतकालिकाचे तसेच महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी निवड झालेल्या विद्यार्थी अभिषेक हिरेमठस्वामी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सात विद्यार्थ्यांचा आणि सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तीन विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून AEDP अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवाची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय IQAC व NEP समन्वयक डॉ. एस. बी. राजमाने यांनी करून दिला. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. जे. बिरजे यांनी केले, तर श्री. रोनित खराडे (प्लेसमेंट ऑफिसर) यांनी आभार मानले.

    या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक ॲड. वैभव पेडणेकर व ॲड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.