|
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त माहितीपट व लघुपटाचे आयोजन
कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट : देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा व साहित्याचा परिचय करून देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनप्रवास, सामाजिक कार्य, साहित्यनिर्मिती आणि समाजपरिवर्तनातील योगदान यांवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. तसेच त्यांच्या गाजलेल्या "स्मशानातील सोनं" या कथेनुसार तयार करण्यात आलेला प्रभावी लघुपट (Short Film) प्रदर्शित करण्यात आला. या चित्रफितींमधून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांचे वास्तववादी चित्रण विद्यार्थ्यांसमोर उलगडले.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आर. जे. बिरजे यांनी केले. त्यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविक मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची आजच्या काळातील उपयुक्तता, समता, मानवता आणि सामाजिक न्याय यांसारख्या मूल्यांची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली.
यावेळी श्री. पी. एम. सोरटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने समाजातील वंचित घटकांना दिलेला आवाज आणि त्यांच्या विचारांचे आजही असलेले महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी डॉ. निलेशकुमार जाधव व श्री. पी. पी. पोतदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमास सुमारे ७२ मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
|