देशाच्या संविधान निर्मितीत डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे योगदान मोठे असून, ते संविधानाचे खरे उपासक आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कृष्णात खोत यांनी रविवारी केले. येथील डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, संचालक अॅड. अमित बाडकर, अॅड. वैभव पेडणेकर, डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे उपस्थित होते.
खोत म्हणाले, रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी, समाजासाठी खर्च केले. त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर या देशातील लोकांच्या कल्याणासाठी आयुष्य वेचले. डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्याद्वारे स्थापित कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तोच वारसा आम्ही पुढे चालवत असल्याचे सांगितले.
महाविद्यालयामध्ये नव्याने स्थापित केलेल्या लँग्वेज लॅबचे उद्घाटन प्रा. डॉ. कबीर खराडे यांच्या हस्ते तर मुर्लीच्या बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन रजनी मगदूम यांच्या हस्ते केले. प्रा. डॉ. ताहीर झारी लिखित 'जादुई सोच', 'बीबीए कोर्स गेट वे ऑफ करिअर एक्सलन्स' आणि डॉ. हुगार यांनी कन्नड भाषेत लिहिलेल्या रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या चरित्राचे प्रकाशन केले. पी. बी. पाटील, बी. डी. कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. एस. एस. देसाई यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुण शिंदे आणि अश्विनी मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.